लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळले; जयंत पाटील आणि वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सुमारे ८० लाख महिलांना ई-केवायसी पूर्ण न केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी हा निर्णय राज्याच्या वाढत्या आर्थिक अडचणींचे द्योतक असल्याचे म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता त्याच लाभार्थींना अपात्र ठरवण्यात येत असल्याने सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. राज्यावरील आर्थिक ताण वाढत असून त्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसल्याची टीकाही त्यांनी केली.

योजना सुरू करताना योग्य नियोजन झाले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे सांगत त्यांनी भविष्यात आणखी महिलांना विविध कारणे देत योजनेतून वगळले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली.

दरम्यान, नागपुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. निवडणुका संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांना आश्वासने देऊन आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
लाडकी बहीण योजनेतील मोठ्या प्रमाणावरील अपात्रतेच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें