सर्वांचेच पूर्ण समाधान होऊ शकत नसल्याचे कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई प्रतिनिधी
शेतकऱ्यांना अटी घालून कर्जमाफी न देता बिनशर्त सातबारा कोरा करा, या मागणीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफी संदर्भात बैठक मंगळवारी आयोजित केली जाणार आहे अशी माहिती कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. त्याचवेळी शक्य नसल्याचेही त्यांनी सूचित केले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, त्याच्या अटी आणि निकषांमुळे राज्यभरातील सर्वच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही. राज्य सरकारच्या या भूमिकेबद्दल आक्षेप घेत रोहित पवार आंदोलन करीत आहेत. याबद्दल बोलताना कृषिमंत्री म्हणाले की, राज्याची आर्थिक परिस्थिती तणावात असताना देखील मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीचा धाडसी निर्णय घेतला आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक झाल्यानंतर जी चर्चा होईल त्यातून सर्व समज गैरसमज दूर होतील, असा दावाही त्यांनी केला.
कालपासून दोन वेळा रोहित पवार यांच्याशी आपले बोलणे झाले आहे. त्यांनी सरकारला एक निवेदन देखील दिले आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दलची माहिती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. मंगळवारच्या चर्चेतून शेतकरी कर्जमाफीवर निश्चितपणे मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









