पुणे: प्रतिनिधी
पुणे रेल्वे विभागाची क्षमता पुढील १,००० दिवसांत दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा केंद्र सरकारने हाती घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना पुणे, हडपसर, खडकी, घोरपडी, शिवाजीनगर, फुरसुंगी आणि आळंदी स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे पुणे परिसरातून किमान २० नवीन रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
हडपसर स्थानकावर चार नवीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले असून येथून पाच अतिरिक्त गाड्या सुरू करण्याची व्यवस्था झाली आहे. खडकी स्थानकाचे आधुनिकीकरण सुरू असून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ चे काम पूर्ण झाले आहे, तर आणखी एका प्लॅटफॉर्मचे बांधकाम सुरू आहे. घोरपडी येथे अत्याधुनिक कोच देखभाल केंद्र उभारले जात आहे. शिवाजीनगर स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि स्टेबलिंग लाईनची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचा सर्वाधिक मोठा कायापालट होणार असून सध्या असलेले सहा प्लॅटफॉर्म वाढवून त्यांची संख्या १२ करण्यात येणार आहे. यासाठी देखभाल आणि तांत्रिक कामकाज घोरपडी, फुरसुंगी आणि आळंदी येथे हलविण्यात येत आहे.
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आळंदी येथे उभारण्यात येणारे मेगा रेल्वे टर्मिनल. या टर्मिनलमध्ये नऊ प्लॅटफॉर्म, सात पिट लाईन्स आणि १७ स्टेबलिंग लाईन्स असतील. या सुविधेमुळे दररोज सुमारे ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन शक्य होणार आहे. उरुळी येथे प्रस्तावित असलेला हा प्रकल्प जमीन संपादनाचा खर्च जास्त असल्याने आळंदी येथे हलविण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकल्प पुढील सुमारे १,००० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कामकाजादरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून काही गाड्यांचे संचालन हडपसर स्थानकावरून सुरू करण्यात आले आहे.
यावेळी त्यांनी भविष्यातील मुंबई–पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाचाही उल्लेख केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन एक्स्प्रेसला हिरवा कंदील
पुणे आणि अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत रेल्वे प्रशासनाने पुणे–साईनगर शिर्डी दैनंदिन एक्स्प्रेस सुरू केली आहे. ही गाडी पुण्यातून दररोज सकाळी ६.५५ वाजता सुटून दुपारी १२ वाजता शिर्डीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती सायंकाळी ६.१० वाजता शिर्डीतून सुटून रात्री ११.५५ वाजता पुण्यात दाखल होईल.
दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरी करणारे प्रवासी तसेच शिर्डी आणि शनि शिंगणापूर येथे जाणाऱ्या भाविकांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे. १५ एलएचबी डब्यांसह ही गाडी अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला.









