पुणे : प्रतिनिधी
इंडिया आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास त्याला जनतेच्या कौलाशी केलेला विश्वासघात मानला जाईल आणि अशा खासदारांच्या घरांसमोर तीव्र निषेध आंदोलने करण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात तिवारी यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात मतदान करून अनेक खासदारांना निवडून दिले. त्यामुळे निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाणे म्हणजे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अवमान असून ही कृती लोकशाही मूल्यांना धक्का देणारी ठरेल.
तिवारी यांनी दावा केला की, संविधानाचे रक्षण, राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण आणि लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी जनतेने काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला मोठा पाठिंबा दिला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची लोकसभेतील ताकद ५२ वरून १०२ खासदारांपर्यंत वाढली, हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपवर केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप
केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना तिवारी यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), आयकर विभाग आणि इतर संस्थांचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. एवढे प्रयत्न करूनही भाजपला ‘अबकी बार ४०० पार’चा नारा साकार करता आला नाही आणि पक्षाची जागा २४० वर आली, असे त्यांनी म्हटले.
त्यांच्या मते, सध्या केंद्रातील सरकार हे सहयोगी पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. त्यामुळे जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करण्याऐवजी विरोधी पक्षांचे खासदार फोडून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहे.
महाराष्ट्रातील जनादेशाचा उल्लेख
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आणि मतदारांनी भाजपप्रणीत एनडीएपेक्षा विरोधी आघाडीवर अधिक विश्वास दाखवला, असे तिवारी यांनी नमूद केले. शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर मित्रपक्षांच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली होती. त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्षांतर करणे हे केवळ पक्षाशी नव्हे, तर मतदार आणि कार्यकर्त्यांशीही विश्वासघात ठरेल, असे त्यांनी म्हटले.
‘लोकशाहीच्या हत्येला विरोध करणार’
दलबदलाच्या संभाव्य हालचालींवर चिंता व्यक्त करताना तिवारी यांनी अशा प्रकारच्या राजकारणाला “लोकशाहीची हत्या” असे संबोधले. जनतेच्या स्पष्ट कौलाच्या विरोधात जाऊन सत्तेच्या मोहापायी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेसमोर जाब द्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेससह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते राज्यभर रस्त्यावर उतरून अशा खासदारांविरोधात आंदोलन करतील आणि त्यांच्या मतदारसंघात तसेच निवासस्थानांसमोर निषेध नोंदवतील, असा इशारा तिवारी यांनी दिला. त्यामुळे राज्यातील संभाव्य राजकीय घडामोडींवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.









