पंढरपूर कॉरिडॉरचे काम अडीच वर्षांत पूर्ण करणार : मुख्यमंत्री फडणवीस

पंढरपूर, दि. २५ : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेऊन पंढरपूर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार असून, कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक अमृता फडणवीस तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्यासमवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येतात. मात्र, मंदिर परिसरात जागेची मोठी मर्यादा आहे. त्यामुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे. यावर्षीच कॉरिडॉर विकासाचे काम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पात स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील तसेच भाडेकरूंचीही योग्य व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या वारीने गर्दीचा नवा उच्चांक गाठल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, दर्शनासाठी २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांग लागली होती. अनेक भाविकांना २५ तासांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली. तरीही वारकऱ्यांनी कोणतीही नाराजी न व्यक्त करता विठ्ठलनामाचा गजर करत भक्तिभावाने दर्शन घेतले.

चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ राहावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून, वाळवंट परिसरातही स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणारा वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, उद्योजक तसेच समाजातील विविध घटकांमधून येतो. वारकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांना मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री आणि राज्य शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. दर्शन रांगेत मोठ्या संख्येने वारकरी असतानाही प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे भाविकांना चांगल्या सुविधा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.

‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण

पाणी संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानने प्रथम क्रमांक पटकावला. जालना येथील वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठानला द्वितीय, तर आळंदी देवाची येथील गोऱ्हेकर संस्थेला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना पुरस्कार आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें