मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन

मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

जालना प्रतिनिधी :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून राज्यव्यापी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याचा इशारा दिला.

राज्यात मराठा समाजाच्या 58 लाख नोंदी उपलब्ध झाल्याचा दावा करत, या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटियर आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र वाटप सुरू झाले नाही, तर 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला, मात्र अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असा आरोप जरांगे यांनी केला. केवळ बैठका आणि समित्यांच्या माध्यमातून वेळकाढूपणा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणातील सवलती, ईसीबीसीसह विविध योजनांचे अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली. तसेच सारथीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र मराठा युवकांना मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सर्व राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या प्रश्नासाठी एकत्र यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. मराठा समाजाची एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

“58 लाख नोंदींच्या आधारे पात्रांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका जरांगे यांनी मांडली. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें