मुंबई : मालाड पूर्व परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. २०२२ मध्ये नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार न करता भविष्यातील वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याला पुन्हा जिवंत करता येईल, या आशेने मृतदेह जतन केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्धाचा मृत्यू २०२२ मध्ये झाला होता. अचानक झालेल्या या मृत्यूचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी इंटरनेटवर ‘क्रायोनिक्स’ या संकल्पनेची माहिती घेतली. मृतदेह अत्यंत कमी तापमानात जतन करून भविष्यात वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाल्यानंतर त्याचे पुनरुज्जीवन करता येईल, अशी या प्रक्रियेची संकल्पना आहे.
कुटुंबीयांनी अमेरिकेतील एका विशेष संस्थेशी संपर्क साधल्याचेही सांगितले जात आहे. मृतदेह अमेरिकेत नेऊन जतन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि कागदपत्रांची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मृतदेह मालाड पूर्व येथील एका क्लिनिकमध्ये विशेष फ्रीझरमध्ये ठेवण्यात आला.
क्रायोनिक्स प्रक्रियेमध्ये साधारणपणे शरीर अत्यंत कमी तापमानात, प्रामुख्याने द्रवरूप नायट्रोजनच्या साहाय्याने सुमारे उणे १९६ अंश सेल्सिअस तापमानात जतन केले जाते. अमेरिकेत अशा प्रकारच्या जतनासाठी सेवा आणि व्यवस्थेनुसार सुमारे २८ हजार ते ४५ हजार डॉलर, म्हणजेच अंदाजे २५ ते ४० लाख रुपये खर्च येऊ शकतो.
दरम्यान, संबंधित क्लिनिकमध्ये गेल्या काही काळापासून नूतनीकरणाचे काम सुरू होते आणि ते सुमारे महिनाभर बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. क्लिनिकच्या प्रमुख मालकाला किंवा स्थानिक पोलिसांना फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली नव्हती.
इमारतीतील रहिवाशांना काही काळापासून परिसरातून दुर्गंधी येत होती. दिवसेंदिवस दुर्गंधी वाढत गेल्याने रहिवाशांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता फ्रीझरमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह क्लिनिकचे व्यवस्थापन आणि जागेच्या मालकाची चौकशी सुरू केली आहे. कुरार पोलिस मृतदेह अशा प्रकारे अनेक वर्षे फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी कोणत्या कायदेशीर परवानग्या आवश्यक होत्या, तसेच त्या घेतल्या होत्या का, याचा तपास करत आहेत.
या प्रकरणातील कायदेशीर बाबी स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जात आहे. मृतदेह दीर्घकाळ अशा पद्धतीने जतन करणे कायद्याच्या कोणत्या तरतुदींमध्ये येते आणि संबंधितांकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास सुरू आहे.








