ऐतिहासिक रामटेकच्या भूमीत ४ ऑक्टोबरला रंगणार १८ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन 

सुप्रसिद्ध साहित्यिका उषा राऊत संमेलनाध्यक्ष तर स्वागताध्यक्षपदी सुभाष चव्हाण

  1. नागपूर / रामटेक

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १८ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पवित्र रामटेक भूमीत अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा म्हणूनच जगविख्यात नसून ते एक प्रगल्भ ‘बहुभाषिक विद्वान आणि महान पंडित’ होते. महाराजांची हीच अलौकिक ज्ञानप्रतिभा आणि साहित्यिक ओळख जगासमोर प्रभावीपणे यावी, या मुख्य उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.

या एकदिवसीय दिमाखदार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिका उषा राऊत भूषवणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून सुभाष चव्हाण जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष नामदेव राठोड हे आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथांमधील विद्वत्ता आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर या संमेलनात विविध परिसंवाद, ग्रंथदिंडी आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्यभरातून मोठे साहित्यिक, विचारवंत आणि शब्दरसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रामटेक आणि परिसरातील सर्व साहित्यप्रेमींनी या वैचारिक व सांस्कृतिक सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें