वडोदऱ्यात २५ ऑक्टोबरला रंगणार पहिले ‘सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’

पुणे: मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीला राजाश्रय देणारे महाराजा सयाजीराजे गायकवाड यांच्या ऐतिहासिक कर्मभूमीत म्हणजेच गुजरातमधील वडोदरा येथे पहिले ‘सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी हे संमेलन होणार असून, परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी ही माहिती दिली.

परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतील हे २००वे साहित्य संमेलन असल्याचे आयोजकांनी सांगितल महाराजा सयाजीराजे गायकवाड यांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षणाचा प्रसार, ग्रंथालयांची उभारणी तसेच मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्याला उजाळा देण्याबरोबरच गुजरातमधील मराठी भाषिक आणि साहित्यप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा या संमेलनामागील उद्देश आहे.

या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्य परिषदेच्या गुजरात प्रदेश उपाध्यक्ष रंजनादेवी भोईटे, तर निमंत्रकपदी प्रदेश सरचिटणीस मानसी म्हसकर यांची निवड करण्यात आली आहे.

संमेलनाची सुरुवात पारंपरिक ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा, विविध वैचारिक विषयांवरील परिसंवाद तसेच कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, भाषा आणि संस्कृतीशी संबंधित विविध कार्यक्रमांमुळे वडोदऱ्यात मराठी साहित्याचा जागर होणार आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमधील साहित्यिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या साहित्य सोहळ्यास दोन्ही राज्यांतील लेखक, कवी, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment

और पढ़ें