मुंबई : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली कॉक्रोच जनता पार्टीने या आंदोलनाची हाक दिली असून विरोधी पक्षांकडूनही त्याला पाठिंबा मिळत आहे. दिल्लीमध्येही डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आंदोलकांवर टीका करत निवडणूक आयोगाबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांना ‘फेक नॅरेटिव्ह’ संबोधले. तिन्ही निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर या कथित नॅरेटिव्हचा पर्दाफाश झाल्याचा दावा त्यांनी केला.
“तिन्ही आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या फेक नॅरेटिव्हचा फुगा फुटला आहे. तरीही तो नॅरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांना त्यात यश मिळणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून धारावीचा इतिहास, सध्याची परिस्थिती आणि प्रस्तावित पुनर्विकासाची रूपरेषा नागरिकांना समजणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धारावी हा केवळ झोपडपट्टी परिसर नसून मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. कुंभारवाडा, प्लास्टिक उद्योग, खाद्य व्यवसाय आणि चामड्याशी संबंधित उद्योगांसह विविध प्रकारचे व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुनर्विकासानंतर या उद्योगांसाठी आणि रहिवाशांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध होतील, याची माहिती या उपक्रमातून मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावित लेआऊट, रहिवाशांसाठीची नमुना घरे, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच व्यवसायासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
“उद्याची धारावी कशी असेल, लोकांचे जीवन कसे बदलेल आणि चांगल्या जागेत उद्योग कसे करता येतील, याची माहिती येथे मिळेल. या प्रकल्पात नेमके काय होणार, याचे उत्तर या उपक्रमातून मिळेल,” असे फडणवीस यांनी सांगितले.








