April 26, 2026 10:13 pm

अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी; प्रशासनाचे संयम पाळण्याचे आवाहन

नाशिक प्रतिनिधी 

पेट्रोल टंचाईबाबत पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले.

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे सोशल मीडियावर पेट्रोल बंद होणार असल्याचा संदेश व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडत वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी पंपांवर रांगा लावल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही अफवा अधिक वेगाने पसरल्याचे सांगितले जाते.

नागपूर शहरातही पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असतानाही वाहनधारकांनी घाईघाईने पेट्रोल भरण्यासाठी धाव घेतली. काही ठिकाणी अचानक वाढलेल्या मागणीमुळे इंधन संपल्याची परिस्थिती निर्माण झाली.

सांगली आणि भंडारा जिल्ह्यांतही अशाच प्रकारे अफवांचा परिणाम दिसून आला. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने नागरिकांनी पंपांवर गर्दी केली, त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या.

दरम्यान, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाने इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment