पुणे: प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारू पिऊन झालेले १४ जणांचे मृत्यू हे राज्य सरकारचे विशेषतः खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह विभागाचे मोठे अपयश असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.
पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी व पुण्यातील हडपसर या ठिकाणी रसायनयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. गोपाळ तिवारी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
राज्य सरकार असंवेदनशील आणि निष्क्रिय आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नसून ते निर्आढावलेले आहेत. राज्यभरात सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरकार या वाढत्या गुन्हेगारीकडे बेजबाबदारपणे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे गोरगरिबांचे बळी जात आहेत, अशी टीका तिवारी यांनी केली.
विषारी दारू प्रकरणाचा सखोल तपास करून त्याची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावी आणि या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन करावे. अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तिवारी यांनी दिला. राज्यभरात कायद्याचा धाक निर्माण करून गुन्हेगारांना वठणीवर आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.









