पुरुष लाभार्थींकडून मात्र सक्तीने वसूल केली जाणार रक्कम
मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ई केवायसी न केल्यामुळे अपात्र ठरलेल्या 81 लाख महिलांना यापूर्वी या योजनेअंतर्गत दिलेल्या रकमेची वसुली न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारची फसवणूक करून केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ उठवणाऱ्या पुरुषांकडून त्यांना मिळालेल्या रकमची शक्तीने वसुली करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
वारंवार मुदतवाढ देऊनही ई केवायसी न केलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आले आहे. आता या योजनेचा लाभ एक कोटी 66 लाख महिलांना मिळणार आहे. महिला लाभार्थींना वगळण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सरकारला यावरून धारेवर धरत आगामी काळात ही योजना बंद पडण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. अपात्र महिलांची नोंद करून घेऊन त्यांना इतके दिवस या योजनेचा लाभ मिळू देणाऱ्या भ्रष्ट अथवा हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करून घेण्यात यावी, अशी मागणी ही विरोधकांनी केली आहे.
सरकारने 81 लाख लाभार्थींना योजनेतून वगळल्यानंतर त्यांना आतापर्यंत मिळालेल्या रकमेचे नेमके काय होणार, त्याची वसुली संबंधित महिलांकडून केली जाणार का, याची धास्ती वगळलेल्या महिलांमध्ये होती. मात्र, फडणवीस यांनी ही वसुली केली जाणार नसल्याचे सांगत या महिलांना दिलासा दिला आहे.
केवळ महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला असल्याचे पडताळणीत उघड झाले होते. या योजनेतून हजारो रुपये लाटणाऱ्या या पुरुषांकडून मात्र त्यांना मिळालेली रक्कम सक्तीने वसूल करण्यात येणार आहे, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
English news with heading pls









