लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात शोककळा

ठाणे : प्रतिनिधी

हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संचिता उगले हिच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संचिता नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव परिसरात आई-वडील आणि १५ वर्षीय बहिणीसोबत राहत होती. रविवारी सायंकाळी घरातील सदस्य बाहेर गेल्यानंतर ती घरी एकटी होती. त्याचवेळी तिने घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही वेळाने ही बाब उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

संचिता उगलेने अल्पावधीतच अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या मालिकेतील ‘सुकून’ या भूमिकेमुळे ती विशेष चर्चेत आली होती. याशिवाय ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘छावा’ या चित्रपटात तिने ताराबाईंची भूमिका निभावली होती. तिच्या अभिनयाचे आणि सहज वावराचे प्रेक्षकांकडून कौतुक होत होते.

अभिनयासोबतच संचिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे १.३९ लाख फॉलोअर्स होते. विविध व्हिडीओ, रील्स आणि दैनंदिन आयुष्यातील क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असे. विशेष म्हणजे, निधनाच्या काही तासांपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातील ‘राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर तिने लिपसिंग करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला होता. त्याच व्हिडीओला ‘Another Banger’ असे कॅप्शन देत तिने इंस्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केले होते.

सोशल मीडियावर आनंदी आणि उत्साही दिसणाऱ्या संचिता उगलेच्या अचानक जाण्याने तिचे चाहते, सहकलाकार आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक जण हादरले आहेत. तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोकसंदेशांचा वर्षाव होत असून अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, आचोळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा शोध पोलिस घेत असून तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. संचिता उगलेच्या अकाली निधनामुळे मनोरंजन विश्वाने एक गुणी आणि आश्वासक अभिनेत्री गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें