‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अचानक बंद झाल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अवघ्या १५२ भागांनंतर ही मालिका बंद करण्यात आल्याने प्रेक्षकांसह सामाजिक क्षेत्रातूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मालिकेचा शेवटचा भाग १४ जून रोजी प्रसारित झाला. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

मालिका बंद होण्याच्या निर्णयावर अमोल कोल्हे यांनी सातत्याने आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्यांनी मालिकेला थांबवण्यात आल्याबाबत खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी ५० लाख रुपयांची तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

मालिका संपली असली तरी फुले दांपत्यांच्या विचारांची गोष्ट थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त करत कोल्हे यांनी नव्या मालिकेची घोषणा केली. मात्र ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित होणार, त्यात कोणते कलाकार असतील आणि ती नेमकी कधी सुरू होणार याबाबतची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राने देशाला वैचारिक दिशा दिली असून ती परंपरा कायम राखण्यासाठी समाजप्रबोधन करणाऱ्या अशा कलाकृतींची गरज असल्याचे सांगितले. आर्थिक अडचणी असल्या तरी हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment

और पढ़ें