मॉन्सूनची तारीख पे तारीख, पेरणीची घाई नको 

कृषी हवामान विभागाचा शेतकऱ्यांना इशारा

पुणे प्रतिनिधी

हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे मॉन्सूनची तारीख पे तारीख अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अन्यथा, दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

यापूर्वी, पंधरा तारखेला मॉन्सूनचा पाऊस राज्य व्यापून टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मान्सून अद्याप अरबी समुद्रात अडकला असून राज्यात दाखल होण्यासाठी 20 तारीख उजाडण्याचा नवा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यावर्षी प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव आहे. त्यामुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी असणार हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातून मॉन्सूनचा प्रवास सुरू असताना अफगाणिस्तान कडून येणाऱ्या वाऱ्यांनी मॉन्सूनला जागीच खिळवून ठेवले आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीला आळा बसला आहे.

दरवर्षीच्या पर्जन्यमानाच्या गणिताप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आपली शेती तयार करून ठेवली आहे. बियाणे आणि खतांचा साठा करून ठेवला आहे. मात्र, मॉन्सूनचा प्रवास ठप्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मॉन्सूनचे आगमन आणखी लांबल्यास पेरणी आणि पावसाचे समीकरण बिघडून दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. अर्थातच दुप्पट खर्चाचा भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडू शकतो, असा इशारा कृषी हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

और पढ़ें