ठाकरे गटाला मोठा धक्का; सहा खासदारांच्या स्वतंत्र गटासाठीची प्रक्रिया पूर्ण

मुंबई/नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षापासून वेगळी वाट धरत स्वतंत्र संसदीय गट स्थापन केला असून, या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्यां यांची अधिकृत मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ठाकरे गटातील फूट आता संसदीय पातळीवरही स्पष्ट झाली आहे.

बंडखोर खासदारांनी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचे पत्र सादर केले. या प्रक्रियेनंतर त्यांच्या गटाला अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पुढील काळात हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गटाला मान्यता मिळण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण खासदारांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गटात सहभागी होत आवश्यक संख्याबळ पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांच्या गटाला कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

रम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला या घडामोडींमुळे अधिक वेग मिळाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील विविध राजकीय हालचाली आणि बैठकींनंतर या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या घडामोडीमुळे ठाकरे गटाचे लोकसभेतील संख्याबळ कमी झाले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या राजकीय घडामोडींचा राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें