धाराशिव : प्रतिनिधी
‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव चर्चेत आल्याने ठाकरे गटातील स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. निंबाळकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे. ओमराजे जर शिंदे गटात सामील झाले तर धाराशिव मध्ये दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला शेण आणि काळे फासू, असा इशारा ठाकरे गटाच्या स्थानिक शिवसैनिकांनी दिला आहे.
स्थानिक शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना एकदा आमदार आणि दोन वेळा खासदार होण्याची संधी शिवसेनेमुळे मिळाली. त्यामुळे अशा परिस्थितीत पक्षाची साथ सोडणे हे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरेल.
दरम्यान, ठाकरे गटासाठी हा धक्का अधिक गंभीर मानला जात आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरच ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर आली असून त्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यताही मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पक्षातील अस्वस्थता आणखी वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर सध्या नवी दिल्लीत असून ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चेमुळे धाराशिवमधील ठाकरे समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येणाऱ्या १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गट स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्याआधीच सुरू झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे.









