… अन्यथा पुन्हा आमरण उपोषण: मनोज जरांगे पाटील यांचा इशारा 

जालना | प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा देत, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या २९ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास नव्याने आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मराठा आरक्षण लढ्याला २९ ऑगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्यापूर्वी सरकारने सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी त्यांनी केली.

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारच्या अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाला ओबीसींसारख्या सवलती देण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही अधिकारी जाणूनबुजून अडथळे निर्माण करत असून त्यामुळे समाजातील नागरिकांना लाभ मिळत नसल्याचे ते म्हणाले.

कुणबी नोंदी असलेल्या अनेक मराठा बांधवांना अद्यापही कुणबी प्रमाणपत्र मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक पुरावे असूनही महसूल विभागातील अधिकारी पडताळणी प्रक्रियेत विलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कराड, मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यातील चाकूर परिसरातील हजारो कुणबी नोंदी अद्याप प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला. मोदी लिपीतील ऐतिहासिक नोंदीही उपलब्ध असून त्या स्वीकारण्यात टाळाटाळ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी पुन्हा लावून धरली. या प्रस्तावाला काही ओबीसी मंत्री विरोध करत असल्याचा आरोप करत सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. यापूर्वी ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्यात आलेल्या काही कुणबी नोंदी हटविण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला.

मराठा समाज ओबीसी आरक्षण काढून घेण्याची मागणी करत नसून, उपलब्ध असलेल्या वैध नोंदींना मान्यता मिळावी आणि कायदेशीर हक्काचे लाभ मिळावेत, एवढीच अपेक्षा असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मे महिन्यातील त्यांच्या आमरण उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींसारख्या काही सवलती, मराठा-कुणबी मंत्रालयाच्या स्थापनेची प्रक्रिया, आंदोलनात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना मदत आणि एमआयडीसी प्रकल्पांमध्ये रोजगाराच्या संधी यांसारख्या घोषणा केल्या होत्या. मात्र या निर्णयांची अंमलबजावणी कागदावरच राहिल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारने आता आश्वासनांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम करावे, अन्यथा २९ ऑगस्टनंतर आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र असेल, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें