मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चांदरम्यान मंत्रीपदाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या वादावर रात्री उशिरापर्यंत चर्चा होऊन तडजोड करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.
राऊत म्हणाले की, बंडखोर खासदारांमध्ये केंद्रीय मंत्रीपद कोणाला मिळणार यावरून नाराजी होती. अखेर एकालाच मंत्रीपद देण्याचे आणि उर्वरितांना वर्षभरात 25 कोटी देण्याचे ठरल्याची माहिती त्यांना मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या आरोपांबाबत संबंधित खासदारांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
बंडखोर खासदार अद्याप जनतेसमोर आलेले नसल्याचे सांगत राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या मतदारसंघात लोक नाराजी व्यक्त करत असून काही ठिकाणी प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढल्या जात आहेत. त्यामुळे हे खासदार लोकांसमोर जाण्याऐवजी पोलिसांच्या संरक्षणात वावरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील गृहखात्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलीस यंत्रणा बंडखोरांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याची टीका त्यांनी केली. ही परिस्थिती राज्याच्या हिताविरोधात असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी राऊत यांनी बंडखोर खासदारांना थेट आव्हान देत, जर आपल्या निर्णयावर विश्वास असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे, असे म्हटले. पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर पक्षाशी बेईमानी करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी जनतेचा कौल पुन्हा घेण्याचे आव्हान दिले.









