लोहगडावरून पडून तरुण व्यावसायिकाचा मृत्यू

लग्नाच्या महिनाभर आधीच काळाचा घाला

पुणे प्रतिनिधी :

लोहगड किल्ल्यावर मित्र आणि कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय केतन अग्रवाल यांचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. पुढील महिन्यात त्यांचे लग्न होणार होते, तर काही दिवसांत होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले होते. मात्र एका क्षणात घडलेल्या अपघाताने आनंदाचे वातावरण शोकात बदलले.

केतन अग्रवाल हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित उद्योजक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र होते. गुरुवारी सकाळी ते कुटुंबीय आणि मित्रांसह लोहगड किल्ल्यावर गेले होते. किल्ला परिसरात फिरत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की त्यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. कठीण भौगोलिक परिस्थितीत बचावकार्य राबवून केतन यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील महिन्यात जयपूरमध्ये केतन यांचा भव्य विवाहसोहळा होणार होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू होती. पाहुण्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस महाबळेश्वर येथे साजरा करण्याचाही त्यांचा बेत होता.

मात्र लग्नाच्या आणि आनंदाच्या तयारीत असतानाच झालेल्या या अपघातामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. ज्या घरात लग्नाची लगबग सुरू होती, तेथे आता शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पावसाळ्यात लोहगडसह डोंगराळ पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने अशा ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें