औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीवरून रोहित पवार यांचे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. गरिब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मेहनत करून परीक्षा द्यायची, मात्र पैसे घेऊन किंवा ठरावीक लोकांना यंत्रणेत प्रवेश मिळावा या उद्देशाने पेपरफुटी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमिस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल, तलाठी आणि महाजेनको यांसह विविध भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर आल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

विशेषतः अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या पदावर पैसे देऊन एखादी व्यक्ती नियुक्त झाली, तर नोकरी मिळवल्यानंतर खर्च केलेले पैसे वसूल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे औषधांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
औषध निरीक्षक भरतीची जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या परीक्षेला सुमारे ४४ हजार ५०० विद्यार्थी बसले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीत ५०६ उमेदवार पात्र ठरले असून, त्यापैकी १५० उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र झाल्याचे पवार यांनी सांगितले.

नंदुरबारमधील कौटिल्य अकादमीशी संबंधित एका व्यक्तीने पेपरफुटी केल्याचा आरोपही त्यांनी केला. परीक्षेच्या दोन दिवस आधी काही विद्यार्थ्यांकडे सुमारे ९० टक्के प्रश्न उपलब्ध होते. पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सॲपवर प्रश्न पाठवत असे आणि काही मिनिटांत ते ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
एका विद्यार्थ्याने पुरावा म्हणून प्रश्न डाउनलोड केल्यानंतर ते आपल्या मित्राला पाठवले. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रोहित पवार यांनी मूळ प्रश्नपत्रिका आणि परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या कथित प्रश्नपत्रिकेतील साम्य दाखवले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात जाऊन तक्रार करणार असून, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

और पढ़ें