मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊन केंद्रीय मंत्रिपद स्वीकारणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ‘मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे,’ असे स्पष्ट करत फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या वेळी त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या चर्चेला दुजोरा देणारी वक्तव्ये केली होती.
मात्र, फडणवीस यांनी या सर्व चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा केल्यानंतरही त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांबाबत आपण समाधानी असल्याचे सांगितले होते.
आता पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी आपण मुंबईतच असून महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.









