अदिती तटकरे यांची घोषणा
मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत विरोधकांकडून सातत्याने शंका व्यक्त केली जात असताना महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. ज्या लाभार्थी महिलांची ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे अथवा तिच्या काही त्रुटी राहिल्या आहेत, अशा महिलांना ती पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, कालांतराने अनेक अपात्र लाभार्थी महिलांनी आणि हजारो पुरुषांनी देखील या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार उघड झाले.
त्यानंतर लाभार्थींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ई केवायसी सक्तीची करण्यात आली. यात अपात्र आढळलेल्या लाखो महिलांना या योजनेतून वगळण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याची हाकाटी सुरू केली. मात्र, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही वारंवार दिली.
या पार्श्वभूमीवर अदिती तटकरे यांनी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याचा जाहीर केलेल्या निर्णय महिलांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा ठरणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत झालेल्या आंदोलनाबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, लोकशाहीत झालेली चूक दाखवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक असून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.









