‘धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची सर्वप्रथम मागणी राहुल गांधी यांची’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा 

मुंबई प्रतिनिधी

नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पक्षाचे महिन्याभराचे आंदोलन आणि सोनम वांगचुक यांचे 26 दिवसाचे उपोषण झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला असला तरीही त्यांच्या राजीनामाची मागणी सर्वप्रथम लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केल्याचे सांगत याप्रकरणी श्रेयवादाची लढाई सुरू होण्याचे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीची ‘भीमगर्जना’ राहुल गांधी यांनी केल्याचा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाचा भूतकाळ आहेत तर तरुणाई हे या देशाचे भवितव्य आहे. देशातील तरुण वर्ग आणि विरोधक एकत्र आल्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देणे भाग पडले. देशभरात झालेल्या आंदोलनामुळे या सरकारचा अहंकार ठेचला गेला, असे त्यांनी नमूद केले. मात्र, या आंदोलनाच्या यशानंतर राहुल गांधी यांनी कॉकरोच जनता पार्टी आणि तिचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा उल्लेख करून त्यांचे अभिनंदन केले नसल्याबद्दल विचारणा केली असता सपकाळ यांनी या प्रश्नाला बगल दिली.

नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची पद्धत तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी सुरू केली. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हेकेखोरी सुरू आहे. नीट परीक्षेचे पेपर सरकारनेच फोडले. ते विशिष्ट क्लासेसपर्यंत पोहोचवले. त्यातून प्रचंड पैसा कमावला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यास हे पेपरफुटीचे रॅकेट उघड होण्याची भीती असल्यामुळेच सरकार त्यांची पाठराखण करीत राहिले. मात्र, याप्रकरणी युवकांचा उद्रेक उल्लेखनीय ठरला. आज पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांच्या बाबतीत जे बोलले गेले नाही ते या आंदोलनादरम्यान विद्यमान पंतप्रधानांबद्दल बोलले गेले. त्याची दखल जागतिक माध्यमांनी घेतली. त्यामुळे जगभरात भारताची नाचक्की झाली आहे. मात्र, आगामी काळात अशी एक घटना घडेल की ज्यामुळे देशातील राजकारणाला कलाटणी मिळेल, असा दावा सपकाळ यांनी केला.

… म्हणून फडणवीस ठेवतील प्रधान यांच्याहून अधिक वचक 

सपकाळ यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक शब्दात बोचरे टोले लगावले. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबईहून दिल्लीकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात फडणवीस यांना स्थान मिळेल आणि प्रधान यांच्या शिक्षण विभागाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये केसाने गळा कापण्याची कला आहे. त्यामुळे केंद्रात ते प्रधान यांच्यापेक्षा निश्चितच अधिक वचक निर्माण करतील.

Leave a Comment

और पढ़ें