“शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल…”

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने वाद

जळगाव प्रतिनिधी :

वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना वीजेचा काही प्रमाणात त्रास सहन करता येईल, मात्र उद्योगांना वीजपुरवठ्यामुळे अडचण निर्माण होऊ नये, असे पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

वीज उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्योगांना वीजपुरवठा खंडित झाल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे सांगितले. वीज नसतानाही कामगारांचे वेतन द्यावे लागते, मात्र उत्पादन होत नाही. त्यामुळे नवीन उद्योजकही उद्योग सुरू करण्यापूर्वी वीजपुरवठ्याच्या परिस्थितीचा विचार करतात, असे त्यांनी नमूद केले.

“शेतकरी म्हणून आम्ही वीजेचा थोडा त्रास सहन करू शकतो; मात्र उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका,” अशी विनंती पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व समजण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आठवडाभर उपाशी ठेवले पाहिजे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना आधीच कमी दाबाची आणि निकृष्ट दर्जाची वीज मिळते. इतरांना वीजवाटप केल्यानंतर उरलेली वीज शेतकऱ्यांना दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांकडे सरकारमधील मंत्र्यांचा असा दृष्टिकोन असेल तर कृषी क्षेत्राबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. गुलाबराव पाटील ग्रामीण भागातून निवडून येतात, याचे त्यांनी भान ठेवावे. शेतकऱ्यांना गृहीत धरल्यास शेतकरीच त्यांना योग्य उत्तर देतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें