ठाणे प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स पाठवले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील वसंत डावखरे यांनी दाखल केलेल्या खटल्या संदर्भात पाठवण्यात आले असून, त्यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यावेळी वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली होती. परांजपे यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत प्रचार सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत होते.
या प्रकरणी डावखरेंनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर खटला दाखल केला होता. डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले आणि तो निवडकपणे संकलित करून बदनामीसाठी वापरल्याचा आरोप केला. शिवसेनेने मात्र हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
माजी विधानपरिषद उपसभापती आणि ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते वसंत डावखरे यांचे ४ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले. तरीही हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आजही चालू आहे.
या खटल्यात विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश असल्याने त्यांना ६ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे ५ ऑगस्टला तर एकनाथ शिंदे ६ ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.









