छत्रपती संभाजीनगर : नोंदी आणि पुरावे उपलब्ध असतानाही कुणबी जातप्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याच्या घटनांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने नवीन शासन निर्णय (जीआर) काढून प्रमाणपत्रांशी संबंधित प्रकरणे विभागीय आयुक्तांकडे वर्ग केली असतानाही प्रमाणपत्रे रद्द होत असतील, तर हा प्रकार गंभीर असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, प्रमाणपत्रे रद्द होण्याच्या सुमारे दोन महिने आधीच आपण संबंधित मंत्र्यांना या परिस्थितीची कल्पना दिली होती. उदय सामंत यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनाही याबाबत माहिती दिली होती. चुकीचे निर्णय घेऊ नका आणि गोरगरीबांच्या मुलांचे नुकसान करू नका, अशी विनंती आपण केली होती, असे त्यांनी सांगितले.
“माझ्याबद्दल राग असेल तर तो माझ्यावर काढा; मात्र गोरगरीबांच्या मुलांवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. त्यांचे नुकसान करून पाप ओढवून घेऊ नका,” असे आपण संबंधितांना बजावल्याचे जरांगे यांनी सांगितले.
त्यानंतर मंगेश चिवटे आणि उदय सामंत यांनी आपल्याशी संपर्क साधला होता. नवीन जीआर काढण्यात आला असून प्रकरणे विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली आहेत. नव्याने प्रक्रिया सुरू करून सर्व काही सुरळीत केले जाईल, असे त्यांनी सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला.
मात्र, या जीआरचा नेमका उद्देश काय, असा सवाल आपण केला होता, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. कुणबी प्रमाणपत्रे वैध ठरवण्यासाठी जीआर असेल तरच तो निर्णय स्वागतार्ह ठरेल. प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठीच प्रक्रिया राबवली जात असेल, तर त्याला ‘आनंदाची बातमी’ कसे म्हणायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सरकारकडे प्रशासन, विभागीय आयुक्त आणि जीआर सर्व काही असतानाही कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मराठा समाजाची झालेली एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
“तुम्ही समाजाला मोठे होऊ देत नाही. ही एकजूट तुम्हाला सहन होत नाही. आम्ही तुम्हाला हिसका दाखवणार आहोत. आज प्रमाणपत्रे रद्द झाली तरी एक ना एक दिवस सरकार बदलेल आणि प्रमाणपत्रे मिळणारच,” असा इशारा जरांगे यांनी दिला.








