मुंबई : प्रतिनिधी
दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्यानंतर तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळत आहेत. या तपासात अंडरवर्ल्डशी संबंधित मुन्ना झिंगडा हे नाव वारंवार समोर येत असून तो सध्या पाकिस्तानातील कराची येथून कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, वांद्रे गरीबनगर परिसरातील कारवाईचा बदला घेण्यासाठी रचण्यात आलेल्या या कटामागे झिंगडाची महत्त्वाची भूमिका असू शकते. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पाकिस्तानस्थित सूत्रांच्या मदतीने या कटाची आखणी केल्याची शक्यता तपासली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात झिंगडासह दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकील यांच्या संभाव्य संबंधांचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानातील घटक यांच्यातील कथित संबंधांवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष पुन्हा एकदा केंद्रित झाले आहे.
मुन्ना झिंगडा याचे नाव दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यातील गँगवॉरमुळे चर्चेत आले होते. मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील शार्पशूटर म्हणून ओळख असलेल्या झिंगडावर २००० साली बँकॉकमध्ये छोटा राजनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्या हल्ल्यात राजन बचावला होता, मात्र त्याचा निकटवर्तीय रोहित वर्मा ठार झाला होता. या प्रकरणानंतर झिंगडाने थायलंडच्या तुरुंगात दीर्घ काळ शिक्षा भोगली होती.
सध्या सुरू असलेल्या तपासातून या कटामागील अंडरवर्ल्डच्या संभाव्य भूमिकेबाबत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.









