पुणे, प्रतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तब्बल ८१ लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसने राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तिवारी यांनी म्हटले की, लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अनुदान मंजूर करून त्याचे वाटप करण्यात आले. मात्र आता मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र असल्याचे समोर येत असल्याने अर्जांची योग्य पडताळणी का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात संबंधित सचिव, आयएएस अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच राज्याच्या तिजोरीतून गेलेला निधी व्याजासह वसूल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
प्रशासनाने राजकीय दबावाखाली काम करून राज्याच्या महसुलाचे नुकसान होऊ दिल्याचा आरोप करत तिवारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मुख्य सचिव, राज्यपाल आणि आवश्यक असल्यास उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असेही त्यांनी म्हटले.
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.









