हिंगोली प्रतिनिधी
जयपूर येथे आयोजित ओबीसी जनजागृती सभेत ओबीसी नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आणि प्रा. लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढा देताना मृत्यू झालेल्या सुमारे ३० ओबीसी बांधवांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही, असा आरोप वाघमारे यांनी केला.
यावेळी त्यांनी सरकारकडे समान न्यायाची मागणी करत, ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला. तसेच आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि मुंबई जाम करण्याचा इशाराही नवनाथ वाघमारे यांनी दिला. या सभेमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.









