मुंबई : प्रतिनिधी
NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कारवाई आणि आंदोलन दडपण्याच्या सरकारच्या प्रयत्नांविरोधात २६ जुलै रोजी मुंबईत ‘तिरंगा मार्च’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट केली. दिल्लीतील सरकार आणि त्यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच देशभरातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि आंदोलनात सहभागी होऊ न शकणाऱ्यांना महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हा संदेश देणे हा या मोर्चाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय असेल. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे असणार नाहीत तसेच राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. “हा विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
मोर्चादरम्यान कोणी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा, चुकीच्या घोषणा देऊन वातावरण बिघडवण्याचा किंवा महिला, मुली आणि पालकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. मोर्चाची शांतता आणि शिस्त अबाधित ठेवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांना सोबत आणून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
२६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शांततापूर्ण ‘तिरंगा मार्च’च्या माध्यमातून जनतेच्या मनातील संताप दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊया, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.









