पेपरफुटीची तुलना आंबा चोरीशी: चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग

‘पेपरफुटीची तुलना आंबा चोरीशी?’ चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादं
मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पेपरफुटीबाबतच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. पेपरफुटीची तुलना आंबा चोरीशी केल्याचा आरोप करत विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी, एखाद्याने आंबा चोरला म्हणून त्याला फाशीची शिक्षा दिली जात नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक गुन्ह्यासाठी कठोरात कठोर शिक्षा असू शकत नाही, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. आंबा चोरीला गेल्यास दुसरा आंबा विकत घेता येतो; मात्र पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे उद्ध्वस्त झालेले भविष्य पुन्हा मिळवता येत नाही, असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नाची अशी तुलना करणे दुर्दैवी असल्याची टीकाही सपकाळ यांनी केली.

मनसे नेते अमित ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. पेपरफुटी आणि त्यानंतर विद्यार्थ्यांवर होणाऱ्या गंभीर परिणामांची तुलना आंबा चोरीशी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक विद्यार्थी या प्रश्नामुळे त्रस्त आहेत, त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी अशा संवेदनशील विषयावर अधिक गांभीर्याने बोलण्याची गरज असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें