शरद पवार-अमित शाह यांच्यात ‘डील’ झाल्याचा अंजली दमानिया यांचा दावा; पक्ष परत मिळवण्यासाठी तडजोड

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात राजकीय ‘डील’ झाल्याचा नवा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आगामी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शरद पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा मिळवून देण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली होती. त्यानंतर दमानिया यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पवार आणि शाह यांच्यात मतदारसंघ पुनर्रचना तसेच राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याबाबत काही समझोता झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवरूनही दमानिया यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेअशी मागणी त्यांनी केली. आश्वासन दिल्यानंतरही विद्यार्थ्यांचा कथित छळ सुरू राहिल्यास योग्य वेळी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या टीकेवरही दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. रणौत यांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनापुरतीच त्यांची भूमिका असल्याची टीका केली.

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासावरही दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी सरकारी वकील न्यायालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, केंद्रांबाबतचे वाद आणि पडताळणी प्रक्रियेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.

काही विद्यार्थ्यांना सुमारे ११ लाख रुपयांच्या बदल्यात प्रवेश मिळवून देण्याचे कथित आश्वासन दिले जात असल्याचा दावाही दमानिया यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे या मुद्द्यावर यापुढेही आक्रमकपणे लढा देणार का, असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें