ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून ‘भीम’ रणगाडा भेट

राळेगणसिद्धी, प्रतिनिधी :

ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सैनिक अण्णा हजारे यांना भारतीय सैन्यदल आणि संरक्षण विभागाच्या वतीने विशेष सन्मान म्हणून टी-५५ (T-55) प्रकारचा ‘भीम’ रणगाडा भेट देण्यात आला आहे. राळेगणसिद्धी येथे आयोजित कार्यक्रमात हा रणगाडा अण्णा हजारे यांच्या स्वाधीन करण्यात आला.

अण्णा हजारे यांनी भारतीय सैन्यात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबरोबरच समाजकारण आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला आहे. सैन्यदलातील शिस्त, देशसेवा आणि त्यानंतर समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून संरक्षण विभागाने हा उपक्रम राबविला.

टी-५५ अर्थात ‘भीम’ हा रणगाडा भारतीय सैन्याच्या इतिहासातील महत्त्वाचा रणगाडा मानला जातो. देशाच्या संरक्षणात दीर्घकाळ योगदान दिलेल्या या रणगाड्याची स्थापना राळेगणसिद्धी येथे करण्यात येणार असून, त्यामुळे गावातील नागरिकांसह तरुण पिढीला देशसेवा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळणार आहे.

राळेगणसिद्धीचा आदर्श गाव म्हणून झालेला विकास, जलसंधारण, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी उभारलेले कार्य देशभरात आदर्श मानले जाते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत सैन्यदलाने केलेला हा सन्मान गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या प्रसंगी संरक्षण विभागाचे अधिकारी, सैन्यदलाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अण्णा हजारे यांच्या सैनिक ते समाजसेवक या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करणारा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

और पढ़ें