मोदींच्या १२ वर्षांच्या नेतृत्वामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा वाढली: मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या नेतृत्वकाळाने भारताला केवळ राजकीय स्थैर्यच दिले नाही, तर देशाची जागतिक स्तरावरील ओळख, प्रतिष्ठा आणि प्रभावही लक्षणीयरीत्या वाढवला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

फडणवीस म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक, सामाजिक, पायाभूत सुविधा, परराष्ट्र धोरण आणि कल्याणकारी योजनांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज भारत जगातील महत्त्वाच्या शक्तींपैकी एक म्हणून उदयास आला असून अनेक देश भारताकडे विश्वासाने पाहत आहेत. मोदींना आतापर्यंत ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २४ पुरस्कार हे विविध देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध जागतिक सर्वेक्षण संस्था आणि रेटिंग एजन्सींनी मोदी यांना प्रभावी आणि लोकप्रिय नेता म्हणून मान्यता दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, सध्या देशातील २२ राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत असून या राज्यांमध्ये देशाच्या सुमारे ८० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व होते. त्यामुळे मोदी सरकारच्या धोरणांना जनतेचा व्यापक पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देशातील सुमारे २५ कोटी नागरिकांना तीव्र गरिबीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ८१ कोटी नागरिकांना मोफत धान्य आणि अन्नसुरक्षेचा लाभ मिळत आहे. जनधन योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचे बँकिंग व्यवस्थेशी नाते जोडले गेले असून सुमारे ३२ कोटी महिलांची बँक खाती सक्रिय झाली आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ अभियानाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, या उपक्रमामुळे देशभरातील तीन कोटी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. महाराष्ट्रातही या योजनेचा मोठा प्रभाव दिसून येत असून राज्यातील सुमारे ५० लाख महिलांना त्याचा लाभ झाला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, देशभरात चार कोटी घरे बांधून पूर्ण झाली असून आणखी तीन कोटी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. याशिवाय आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडल्याचा दावा त्यांनी केला.

‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’

पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत विचारण्यात आले असता फडणवीस यांनी त्यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.” जे व्यक्ती ना काँग्रेसमध्ये आहेत ना शरद पवारांच्या पक्षात आहेत, त्यांनी केलेल्या अशा सूचनांवर भाष्य करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला त्यांनी “बुडते जहाज” असे संबोधत, त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली जाण्यासाठी कोणीही उत्सुक नसल्याचा दावा केला.

 

Leave a Comment

और पढ़ें