मुख्यमंत्री बदलण्याचीही कुजबूज
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट)मधील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या खासदारांकडून लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाच्या मान्यतेसाठी पत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दिल्लीत या खासदारांनी शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जर हे खासदार शिंदे गटात दाखल झाले, तर लोकसभेत शिंदे गटाची ताकद वाढू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या संभाव्य पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, काही खासदार एखाद्या पक्षात दाखल झाले म्हणून मुख्यमंत्रीपदात बदल होईल, असे मानण्याचे कारण नाही. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही शंका नसल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही तेच मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावले.
यावेळी राज्यात कथित “ऑपरेशन टायगर” राबवले जाणार का, असा प्रश्नही मुनगंटीवार यांना विचारण्यात आला. मात्र या विषयावर त्यांनी सावध भूमिका घेत, आपल्याला अशा कोणत्याही हालचालीची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









