राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे झुरळाला म्हणतात विष्णूचा अवतार

शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा घणाघाती हल्ला

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना (शिंदे गट)चे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ठाकरे कुटुंबीयांवर जोरदार टीका करत, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचा आरोप केला.

“महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. ज्या ठाकरेंना महाराष्ट्राचे कर्ते मानलं जात होतं, त्यांच्याच राजकीय वारसांना आज आपल्या अस्तित्वासाठी झुरळालाही विष्णूचा अवतार म्हणावं लागत आहे,” अशी बोचरी टीका महाजन यांनी केली.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी हा हल्ला चढवला. कथित नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी केलेल्या दीर्घ आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे विजयाचा जल्लोषही करण्यात आला.

राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातून संपूर्ण देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याची क्षमता राज ठाकरे यांच्यात आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीव होत नसल्याचे दिसते.

‘एका झुरळाने दुसऱ्या झुरळाचे अँटेना तोडले’ या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचीही महाजन यांनी खिल्ली उडवली. ठाकरे पिता-पुत्रांकडून ‘झुरळ’ या शब्दाच्या वापरावर टीका करताना त्यांनी उपरोधिकपणे, “आता विष्णूचा झुरळाच्या रूपातील नवा अवतारही समोर आला आहे,” असे म्हटले.

“बाळासाहेब ठाकरे यांना वाघ म्हटलं जायचं. त्यांच्या नातवाने स्वतःची तुलना झुरळाशी केल्याने त्यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील? मग वडिलांची उपमा काय?” असा सवाल करत प्रकाश महाजन यांनी ठाकरे कुटुंबावर आणखी तीव्र शब्दांत निशाणा साधला.

Leave a Comment

और पढ़ें